
मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)।मुंबई उपनगरातील वांद्रे येथील 395 चौ.मी. शासकीय जमीन तिरुमला तिरुपती देवस्थानास वाहनतळ, माहिती केंद्र, कार्यालय व इतर सोयी-सुविधांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याबरोबरच देवस्थानाने बांधलेल्या इमारतीतील 2 हजार चौरस फूट जागा फर्निचरसह जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचाही निर्णय झाला. यावर महसूल विभागाची मालकी राहणार आहे.
वांद्रे येथील ही जमीन तिरूमला देवस्थानास 30 वर्षांच्या कालावधीसाठी एक रूपये वार्षिक नाममात्र भाडे दराने देण्यात येणार आहे. ही जमीन देवस्थानास यापूर्वीच भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या 648 चौरस मीटर जमिनीच्या समोर आहे. या नव्या भूखंडावर देवस्थान वाहनतळ, माहिती केंद्र व कार्यालयासह इतर सोयी-सुविधा उभारणार आहे. ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीचीच राहणार असून, देवस्थानाने ती फक्त मंजूर उद्देशासाठीच वापरायची आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानास तीन वर्षांच्या आत बांधकाम करावे लागणार असून येथील 2000 चौ.फूट जागा शासनासाठी राखून ठेवावी लागणार आहे. देवस्थानाने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देवस्थानाला ही जागा सुसज्ज स्वरूपात जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्याकडे सुपूर्द करावी लागणार आहे. भाडेपट्टयाच्या 30 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर देवस्थानाला विहित पध्दतीने नूतनीकरण करावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर