
जळगाव , 4 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत जळगावचे रहिवासी आणि मूळचे नांद्रा बु (ता. जळगाव ) येथील दर्पण संजय भालेराव व लोकेश संजय भालेराव या सख्ख्या भावांनी एकाच वेळी यश मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. लोकेश यांनी राज्यात ४५ वा क्रमांक मिळवला असून दर्पण यांनी ९५ वा क्रमांक मिळवून यशस्वी उमेदवारांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या यशामुळे दोघांनाही आता राजपत्रित वर्ग १ अधिकारी पदावर नियुक्ती मिळणार आहे.दोघांचे वडील संजय काशिनाथ भालेराव हे सध्या नांद्रा बु, जळगाव येथे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील ३-४ वर्षांपासून दोघेही परीक्षेची तयारी करत होते. अनेक वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचूनही केवळ १-२ गुणांनी अंतिम यादीत स्थान मिळवता आले नव्हते. मात्र त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर यश त्यांच्या पदरी आले.या दुहेरी यशामुळे संपूर्ण कुटुंबात आणि गावात आनंदाचे वातावरण आहे. शिक्षक वडिलांचे मार्गदर्शन, भावंडांचे परिश्रम आणि जिद्द हे या यशाचे खरे शिल्पकार ठरले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर