रत्नागिरी : चिपळूणच्या विद्याभारती गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर' पालघर येथे उत्साहात
रत्नागिरी, 4 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल पंचकोश गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर पालघर येथे उत्साहात पार पडले. पालघर जिल्ह्यातील पडघे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या निवासी आश्रमशाळेत आठ दिवसांचे हे शिबिर झाले
चिपळूणच्या विद्याभारती गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर' पालघर येथे उत्साहात


रत्नागिरी, 4 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल पंचकोश गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर पालघर येथे उत्साहात पार पडले.

पालघर जिल्ह्यातील पडघे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या निवासी आश्रमशाळेत आठ दिवसांचे हे शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन वझे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सत्राला पडघे गावचे सरपंच अनिल हाडळ व विद्याभारती कोकण प्रांताचे सहमंत्री विवेक पितळे यांची विशेष उपस्थिती होती. शिबिरात परिसर भेट, श्रमसंस्कार, क्षेत्रभ्यास, आदिवासी घरांना भेटी, परिसरातील लघुउद्योगांना भेटी, मुलाखती, बौद्धिक चर्चासत्र, खेळ, सातपाटी बंदर, जव्हार संस्थान, कर्णबधिर व मतिमंद मुलांची शाळा, अमूल व कॅम्लिन कंपन्यांना भेट, इत्यादी उपक्रमांचे आयोजन या शिबिरामध्ये करण्यात आले होते.

शिबिरात पालघर जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती या विषयावर प्रसिद्ध वक्ते रवींद्र भुरकुंडे यांनी मार्गदर्शन केले. पालघर जिल्ह्यातील सर्प याविषयी ज्येष्ठ सर्पमित्र प्रकाश ऊर्फ बंधू चौधरी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. शिबिराच्या 'व्यक्तिपरिचय' उपक्रमांतर्गत 'वनवासी भागातील कार्य' या विषयावर सामाजिक कार्यकर्ते भिकाजी राऊत (प्रकल्प अधिकारी, हिंदू सेवा संघ, मनोर- पालघर) यांचा व्यक्तिपरिचय पार पडला. व्यंगचित्र आणि चित्रकला ही कार्यशाळा प्रसिद्ध मुखपृष्ठकार व राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार उमेश कवळे यांनी घेतली तर 'वारली चित्रकला' या विषयावर उद्योजक व चित्रकार अंकुश अतकरी यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना मार्गदर्शन केले. रोहन अभ्यंकर यांनी या शिबिरात कथाकथन विषयावर क्रांतिकारक लाचित बरफुगन यांची कथा सादर केली. संस्था परिचय या विषयांतर्गत ग्रामीण शिक्षण संस्थेची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन वझे यांनी दिली. 'संघशताब्दी आणि पंचपरिवर्तन' या विषयावर केतकी मुसळे तर 'नैसर्गिक संसाधनांचे शास्त्रीय महत्त्व' या विषयावर आदित्य तांबे यांनी मार्गदर्शन केले. 'अखंड भारत' या विषयावर पंकज भरवाड यांनी मार्गदर्शन केले. दैनंदिन शारीरिक व बौद्धिक खेळ स्वयंसेवक अभिजित गाडे यांनी घेतले.

आदिवासी राजघराणे-जव्हार संस्थान, काट्या मारुती, प्रगती प्रतिष्ठान संचालित कर्णबधिर विद्यालय, श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे दिव्य विद्यालय, शितलादेवी मंदिर व केळ्ये समुद्रकिनारा, कोकण किनारपट्टीवरचे सर्वाधिक मासेमारी विक्रीचे सातपाटी बंदर- लिलाव व मासेविक्री, माशांची माहिती, सातपाटीचे दीपगृह, प्रसिद्ध श्रीराम मंदिर, शीतगृह, हुतात्मा काशिनाथ हरी पागधरे स्मारक, इत्यादी ठिकाणी मुलांनी भेट देऊन माहिती संपादित केली. पडघे गावातील आदिवासी पाड्यावर जाऊन मुलांनी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृती निर्माण झाली.

पालघर जिल्ह्याचे रा. स्व. संघचालक नरेशजी मराड, चिपळूणच्या माहेरवाशीण- उद्योजिका व सहकार भारतीच्या अध्यक्षा पूर्वाताई सावंत, सातपाटी बाजार समितीचे योगेश पाटील, सागरी सीमा मंचाचे नितीन तरे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे संशोधक भाऊ गावडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांतदादा पाटील, उद्योजक प्रशांत पाटील, ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पाटील व भाग्यश्रीताई पाटील आदी मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन मुलांचे कौतुक व स्वागत केले.समारोप सत्राला ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्कूल कमिटीचे चेअरमन अनिल तरे व विवेक पितळे यांची विशेष उपस्थिती होती.

विद्याभारती स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत सावर्डेकर, संस्थेच्या सेक्रेटरी छायाताई मुसळे, भाई उपाले यांनी पालघर येथील शिबिराला सदिच्छ भेट दिली. शिबिरात नऊ विद्यार्थी, अकरा विद्यार्थिनी, पाच शिक्षक असे एकूण २५ जण सहभागी झाले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्याभारती प्रांतमंत्री संतोष भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल प्रकल्प समन्वयक प्रसाद सनगरे, शिबिर पालक सिद्धीताई जाधव, शिबिर प्रमुख रोहन सिनकर, व्यवस्था प्रमुख सुश्रुत चितळे, अनुशासन प्रमुख आदित्य तांबे व संस्कार प्रमुख केतकीताई मुसळे यांनी विशेष मेहनत घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande