
परभणी, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। “जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तीव्र रोष मतपेटीतून उमटेल, या भीतीपोटीच सत्तारूढ महायुती सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीऐवजी नगरपालिकांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात जाहीर केल्या आहेत,” अशी तीव्र टीका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली आहे.
राज्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्राणी यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, आयोगाने अचानक नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून विरोधी पक्षांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.”
दुर्राणी पुढे म्हणाले, “राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेत सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी मतपेटीतून स्पष्टपणे दिसेल, म्हणूनच सरकारने मुद्दाम ग्रामीण निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.”
महाविकास आघाडीच्या निवडणूक तयारीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “पालिका निवडणुका लढविण्यासाठी आघाडी सज्ज आहे. काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवू.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), वंचित बहुजन आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर निवडणूक आघाडीबाबत विचारविनिमय सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis