नाशिक : शासनाच्या धोरणामुळे पाल्यास शाळेत न पाठवण्यावर पालक ठाम
दिंडोरी, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। आमचा विरोध शिक्षकांना नाही, तर शासनाने ठरवलेल्या धोरणाविरुद्ध आहे. आणि त्या धोरणावर जोपर्यंत विचार केला जाणार नाही, त्यात बदल होणार नाही. तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही. पालकांशी संवाद साधण्यासाठी
शासनाच्या धोरणामुळे पाल्यास शाळेत न पाठवण्यावर पालक ठाम


दिंडोरी, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। आमचा विरोध शिक्षकांना नाही, तर शासनाने ठरवलेल्या धोरणाविरुद्ध आहे. आणि त्या धोरणावर जोपर्यंत विचार केला जाणार नाही, त्यात बदल होणार नाही. तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही. पालकांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या गटशिक्षण अधिकाऱ्यांसमोरच जानोरी येथील पालकांनी पवित्रा घेतल्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनासमोर पेच तयार झाला आहे. त्यामुळे संवर्ग-१ च्या बदली धोरणाबाबत प्रशासन कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यातच झाला आहे त्यामुळे आता शिक्षण विभागासमोर मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे.

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेत बहुतेक सर्व शिक्षक सवर्ग - १ मधून आले. एकूण आठ शिक्षकांपैकी चार शिक्षक पुढील शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संवर्ग एकमधील शिक्षकांची नियुक्ती करताना त्यास प्रमाण असावे, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांसह प्रशासनाला करून देखील त्याचा विचार न झाल्याने पालकांनी शाळेतून सर्व विद्यार्थ्यांचे दाखले देण्याची मागणी केली.

यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांसह प्रशासनाला निवेदने देऊनही त्याची दखल घेतली नाही, यामुळे नाराजी व्यक्त करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सर्व पालकांनी दाखले मागणीबाबत निवेदन दिले होते.

यावर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या आदेशाने गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण तसेच विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी, कैलास पगार, केंद्रप्रमुख विजय निकम यांनी जिल्हा परिषद शाळा जानोरी येथे येऊन ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालकांशी संवाद साधला. यावेळी पालकांना दाखले न काढण्याबाबत विनंती केली. तसेच गुणवत्ता ढासळणार नाही, याबद्दल दक्षता घेणार असल्याचेही आश्वासन दिले. संवर्ग-१ मधून किती शिक्षक द्यायचे याचे धोरण शासनस्तरावर ठरत असल्याने पालकांच्या असलेल्या भावना वरिष्ठ स्तरांपर्यंत आपण पोहोचवू, असेही आश्वासन दिले.

८ संवर्ग-१ मधून किती शिक्षक एका शाळेवर नियुक्त करायचे, याचे धोरण शासन स्तरावर ठरले जाते; परंतु पालकांच्या भावना आमच्या लक्षात आल्या असून, आपल्या भावना लेखी स्वरूपात वरिष्ठ स्तरावर पोहोचवण्याचे आम्ही नक्की करू. पालकांनी चुकीचा निर्णय घेत दाखले काढू नये, असे भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, दिंडोरी यांनी आवाहन केले आहे.

आमचा लढा त्या शासनाच्या धोरणाविरुद्धच असून त्यात बदल होण्याकरताच आम्ही हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी याबद्दल आवश्यक ते पाऊल उचलणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा जानोरी येथील पालकांनी घेतला आहे.

यावेळी उपसरपंच हर्षल काठे, तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिता बोस, उपाध्यक्ष शरद काठे, शिक्षणतज्ज्ञ संदिप गुंजाळ पालक किशोर जाधव, गोरख जाधव, प्रवीण चौधरी, सुनील बोस यांच्यासह मुख्याध्यापिका लीना गोसावी यांसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande