
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी महत्वाचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मौजे वाईगोळ, तालुका मनोरा, जिल्हा वाशीम येथील नियोजित भक्तनिवास प्रकल्पासाठी शासनाने तब्बल ₹८३ लाख ३० हजार रुपयांचे भोगवाटाशुल्क माफ केले आहे. यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर झाला असून कामाला गती मिळणार आहे.
ही जागा पोहरादेवी मंदिर परिसराजवळील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असून येथे येणाऱ्या भाविकांसाठी सुव्यवस्थित निवास व्यवस्था करण्याचा मानस पूर्वीपासून होता. मात्र शासकीय शुल्क व तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाला विलंब होत होता. माननीय जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर हा निर्णायक निर्णय घेण्यात आला.
भक्तनिवास तयार झाल्यावर पोहरादेवीला येणाऱ्या हजारो भाविकांना विश्रांती, निवास, भोजनालय, शौचालये, पार्किंग यासारख्या मूलभूत सोयी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे श्रद्धास्थानासोबतच धार्मिक पर्यटनाला मोठा चालना मिळेल. महाराष्ट्रासह देशभरातून पोहरादेवीला येणाऱ्या यात्रेकरूंना हा उपक्रम वरदान ठरणार आहे.
शुल्क माफीमुळे केवळ प्रकल्पाचे अर्थकारण सुलभ झाले नाही, तर दीर्घकाळ प्रलंबित असलेला विकासमार्गही प्रशस्त झाला आहे. या निर्णयानंतर बंजारा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
माननीय मंत्री संजय राठोड म्हणाले,
पोहरादेवी हे आपले श्रद्धास्थान आहे. भाविकांच्या सुविधेसाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक होता. शासनाने शुल्क माफ केल्याने आता कामांना गती देऊन हा भक्तनिवास लवकरच भाविकांच्या सेवेत आणू.
पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या आध्यात्मिक महत्तेसोबतच आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर