
पुणे, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी एमएक्स ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू होत आहे. नव्या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक चारचाकी वाहनधारकांना तीनपट शुल्क भरून राखीव ठेवण्याची तर उर्वरित क्रमांकांसाठी दुचाकी वाहनधारकांकडून आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलावाद्वारे वाटप करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक तीनपट शुल्क भरून राखीव ठेवू इच्छिणाऱ्या चारचाकी वाहनधारकांनी दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी दुचाकी वाहनधारकांनी दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज नवीन वाहन नोंदणी विभागात सादर करावेत.
अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड), पत्त्याचा पुरावा (आधारकार्ड, टेलिफोन बील इत्यादी),आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, शुल्कासाठीचा डिमांड ड्राफ्ट “DYR.TO PIMPRI CHINCHWAD” या नावे कोणत्याही राष्ट्रीयकृत / अनुसूचित बँकेच्या पुणे शाखेवर देय असावा.
चारचाकी वाहनांच्या अर्जांची यादी ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. संबंधित अर्जदारांनी त्या दिवशी दुपारी २.३० वाजेपर्यंत अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट सीलबंद पाकिटात सादर करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात, नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया पार पाडली जाईल.
दुचाकी वाहनांच्या अर्जांची यादी १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. दुचाकी लिलावाची प्रक्रिया त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता पार पाडली जाईल.
वाहन क्रमांक आरक्षित झाल्यानंतर त्याचा SMS अर्जदाराच्या मोबाईलवर पाठविला जाईल. संबंधित अर्जदारांनी आरक्षणानंतर पाचव्या दिवशी कार्यालयातून क्रमांकाची पावती प्राप्त करून घ्यावी.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव क्रमांक आरक्षणाच्या तारखेपासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क शासनाकडे जमा होईल. राखीव क्रमांकासाठी भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही किंवा समायोजित करता येणार नाही. आकर्षक क्रमांकांच्या शुल्कात बदल झाल्यास त्यावेळी लागू असलेले विहित शुल्क लागू राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु