
पुणे, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी केली. या निवडणुकांमध्ये बारामतीचाही समावेश असून, शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे पक्ष काँग्रेससाठी सारखेच प्रतिस्पर्धी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जुन्नरची निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
चव्हाण म्हणाले, पूर्वीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला आणि पदे भोगल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या जाण्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्ह्यात काँग्रेसची पुन्हा उभारणी करू.आगामी सर्व निवडणुकांत काँग्रेस पक्ष सर्व गट, गण आणि वॉर्डांत आपले उमेदवार उभे करणार आहे. लोणावळा, खेड, हवेली, आंबेगाव, इंदापूर, तसेच बारामती येथेही आम्ही स्वबळावर लढणार आहोत, असेही चव्हाण म्हणाले. माजी जिल्हाध्यक्ष भन्साळी म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरही काँग्रेस पक्ष अडचणीतून बाहेर पडला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु