
नांदेड, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।मुंबईतील वरळी डोम (एमएनसीआय) येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड उत्तर व दक्षिण जिल्हातील आढावा घेण्यात आला.
यावेळी अजितदादा पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. बैठकी दरम्यान नांदेड उत्तर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात युती बद्दल तसेच जिल्ह्याची एकूण परिस्थिती याची सविस्तर माहिती मुद्देसुद मांडली.
यानंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांनी प्रत्येकाने मांडलेल्या सूचना व मतांना गांभीर्याने ऐकून घेत, पक्षाच्या सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्तार यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी परिवारातील प्रत्येक सदस्याने एकजुटीने काम करून पक्षाची विचारधारा, पक्षाने केलेली कामे आणि जनहिताचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
या बैठकीला पक्षाचे मंत्रीमंडळातील सदस्य राज्याचे सहकार मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे संपर्कमंत्री बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवळ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आमदार संजय खोडके, आ. शिवाजीराव गर्जे, यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे मान्यवर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis