
रत्नागिरी, 4 नोव्हेंबर, (हिं. स.) | रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पाच जणांना विशेष पुरस्कार जाहीर केले आहेत. प्रवीण जोशी, मीरा नाटेकर, डॉ. अश्विनी देवस्थळी, डॉ. अश्विनी गणपत्ये, डॉ. पंकज घाटे यांचा त्यात समावेश आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात दुपारी साडेतीन वाजता पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका शोभा नाखरे यांचे संकल्प सकारात्मकतेचा या विषयावर व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शोभा नाखरे या द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका असून त्या कर्णबधिर मुलांना शिकवतात, दहावीच्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. एनसीईआरटीचा राष्ट्रीय पुरस्कार व कर्तृत्ववान महिला महापौर पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
सन्मानप्राप्त प्रवीण जोशी रा. स्व. संघाचे लहान वयापासून स्वयंसेवक आहेत. मनाच्या श्लोकांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत नातवंडांच्या प्रेरणेने त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला व ७० श्लोक अर्थासह पाठ करून स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. एकूण ५०० स्पर्धकांतून ८३ जणांनी विजेते पदावर आपले नाव लिहिले त्यात रत्नागिरी संघातील एकूण २८ जणांनी विजेतेपद प्राप्त केले.
सत्कारमूर्ती मीरा मुकुंद नाटेकर यांनी जून २०२५ मध्ये शृंगेरी येथील श्री शंकराचार्यांच्या पीठाच्या संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शंकराचार्यांच्या हस्ते २१ हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तिपत्रक मिळविले आहे. त्यांनी दुर्गा सप्तशतीचे शेकडो पाठ केले आहेत. २५ वर्षे स्वानंद पठण मंडळात संस्कृत स्तोत्रांचे नैमित्तिक पठण करतात.
पुरस्कारप्राप्त डॉ. अश्विनी देवस्थळी या एम.कॉम, एमबीए व सेट पात्रता प्राप्त आहेत. त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक आंबा उत्पादकांच्या संदर्भात कौटुंबिक व्यवसायाचे आर्किटेक्चर या विषयावर पीएच.डी. नुकतीच पूर्ण केली. त्या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात बीएमएस विभाग प्रमुख आहेत. एमबीए, बीबीए शाखेतही त्या शिकवतात. त्यांनी आतापर्यंत अॅग्रो- इकोटुरिझम, भारतीय कौटुंबिक व्यवसाय, कोकणातील कृषी व्यवसायातील उदयोन्मुख प्रवृत्ती, कृषी व्यवसायातील व्यावसायिक कौशल्य- महिलांची भूमिका, शाश्वत विकासासाठी कृषी उद्योजकतेची भूमिका यावर संशोधन व संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत.
पुरस्कारप्राप्त चिपळूणच्या डॉ. अश्विनी तेजानंद गणपत्ये यांनी पुणे ते अयोध्या १४०० किमी सायकल यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्या माजी सैनिकांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत. त्या उत्तम सायकलपटू आहेत. त्यांना सुपर रॅंडोनिअर किताब प्राप्त असून याशिवाय त्यांनी ठाणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि परत ठाणे असा ८०० किलोमीटरचा सायकल प्रवास, चिपळूण ते पंढरपूर सायकल वारी केली आहे. त्या धावपटूही आहेत.
गेली १४ वर्षे इतिहासाचे प्राध्यापक म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात डॉ. पंकज घाटे कार्यरत आहेत. त्यांनी वसाहतीच्या शासनकाळातील दक्षिण कोकणातील सामाजिक-राजकीय संक्रमण (१८५७ ते १९४७) या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त केली. लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रासाठी भाषण मालिका, विविध वृत्तपत्र, नियतकालिकांमध्ये १८ लेख प्रसिद्ध झाले आहेत. २ संशोधन प्रकल्प, ८ संशोधन पेपर्स त्यांनी पूर्ण केले आहेत. एमए इतिहासाच्या २० विद्यार्थ्यांना त्यांनी संशोधनासाठी मार्गदर्शन केले आहे.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी