
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून एकूण २९० पदांची भरती आयबीपीएस मार्फत केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mjp.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी सर्वाधिक १४४ पदे उपलब्ध असून त्याशिवाय कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), लिपिक, तसेच इतर तांत्रिक व प्रशासकीय पदे देखील भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील तरुण अभियंत्यांना आणि इतर पात्र उमेदवारांना शासन सेवेत संधी उपलब्ध होणार आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा व स्वच्छता योजना राबवते. या योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने आयबीपीएस मार्फत ही भरती करण्यात येणार आहे.
जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण निकष, तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहिती व अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीमुळे राज्यातील पाणीपुरवठा प्रकल्पांच्या कामकाजाला गती मिळणार असून स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर