
मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्या जागेवर २५० पेक्षा जास्त ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबर च CNG व इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख व सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुला वर अवलंबून राहणे श्रेयस्कर नाही. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांच्या कडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून या द्वारे केवळ एसटीच्या बसेस साठी डिझेल इंधनाचे वितरण होते. अर्थात , पेट्रोल पंप चालवणे आणि त्याचे देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एसटी महामंडळाच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल व CNG या पारंपरिक इंधन विक्री बरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले पंप उभा करणे प्रस्तावित आहे. असे समुच्चय इंधन विक्री पंप हे रस्त्यालगत व व्यावसायीक दृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा आहेत, त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा २५० पेक्षा जास्त जागेवर ४० बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल! यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक-खाजगी भागिदारी तुन चांगला महसूल देखील मिळू शकतो.
मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, खुल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बरोबर देशातील नव्हे तर जगभरातील इंधन विक्रीतील नामांकित कंपनींना एस टी महामंडळाच्या सुमारे २५० पेक्षा जास्त जागांवर व्यवसायिक तत्वावर समुच्चय इंधन विक्री केंद्र उभा करण्यासाठी निमंत्रित करीत आहोत. जिथे एस टी महामंडळाला स्वतःच्या बसेस साठी इंधन भरण्याची सोय असेल याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकाला देखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल.अशा पद्धतीचे ' पेट्रो -मोटेल हब उभा करण्याचा मानस आहे.
भविष्यात व्यावसायीक इंधन विक्रीतुन सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, तसेच महामंडळाला देखील उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होईल!
श्री. प्रताप सरनाईक
परिवहन मंत्री
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर