
जळगाव , 4 नोव्हेंबर (हिं.स.) भुसावळ शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. ज्यात सासऱ्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुनेचाही मृत्यू होण्याची घटना घडली. एकाच दिवशी दोघांची अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.यावल रोड भागातील तापी पॅलेस अपार्टमेंटमध्ये राहणारे ९२ वर्षाचे प्रतापसिंह परदेशी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने दुःखात बुडालेल्या त्यांच्या सुनबाई तुळजादेवी परदेशी (वय ६०) यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. प्रतापसिंह यांचे पुत्र प्रदीपसिंह परदेशी हे पोलिस खात्यातून निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी नांदेड जिल्ह्यात उपनिरीक्षक म्हणून सेवा केली होती. तुळजादेवी परदेशी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.सासऱ्यांची सेवा ही त्यांनी आपल्या जबाबदारीसारखी नव्हे, तर मुलगी म्हणून केली. वयोमानामुळे प्रतापसिंह यांची प्रकृती ढासळल्याने त्यांचे निधन झाले. या दुःखद घटनेनंतर तुळजादेवी नातेवाइकांशी बोलत असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवून कोसळल्या. पती प्रदीपसिंह यांनी धाव घेत पत्नीला सावरायचा प्रयत्न केला, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहाट उजाडेपर्यंत घरात दुहेरी दुःखाचे सावट पसरले होते. एका बाजूला वडिलांचा, तर दुसऱ्या बाजूला पत्नीचा मृतदेह होता. सकाळी ही वार्ता कळताच नातेवाईक, मित्रमंडळी धावून आले. घरभर अश्रूचा महापूर आला. दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर