
पुणे, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। कृषी विभागामार्फत कृषी उन्नती योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये राबविण्यात येत असलेले उच्च प्रतीचे, सुधारित व हवामान प्रतिरोधक वाणांचे बियाणे वापरल्यास पिकांच्या उत्पादनक्षमतेत 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ करता येते. त्यासाठी बियाण्यांच्या नवीन जातींना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी ही योजना असून एकूण 45 हजार 985 हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या उत्पादकता वाढीचे प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) अशोक किरनळ्ळी यांनी दिली.
राज्यात या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) माध्यमातून करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत कृषी विद्यापीठे व इतर संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या उच्च उत्पादक, पोषणदृष्ट्या समृद्ध आणि हवामान प्रतिरोधक नव्या वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा प्रसार करण्यात येणार आहे. गहू व हरभरा या पिकांसाठी एकूण 37 हजार 652 क्विंटल बियाण्यांचे वितरण होणार आहे. बियाण्यांच्या जुन्या वाणांचा वापर कमी करून नव्या वाणांचा समावेश बियाणे साखळीत टप्प्याटप्प्याने वाढविणे आणि बियाणे बदल, दर व वाण बदल दर वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु