प्रदेश काँग्रेस १२ नोव्हेंबरला उमेदवारांची नावे निश्चित करणार
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था
सपकाळ


मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होणार असून या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

या बैठकीला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस खा. रजनीताई पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष तथा गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री के. सी. पाडवी, आ. डॉ. विश्वजित कदम, खासदार डॉ. कल्याणराव काळे, खासदार रविंद्र चव्हाण, वरिष्ठ उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, मोहन जोशी उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अ‍ॅड. गणेश पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतचोरी करून भाजपाचे सरकार आलेले आहे, या मतचोरी विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. राज्य निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली होती परंतु निवडणूक आयोग मात्र यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पण निवडणूक आयोग कसलीच जबाबदारी घेत नसून ते जबाबदारीपासून पळ काढत आहे. आता जनताच धडा शिकवेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची वास्तवदर्शी व्यथा मांडणारे “कर्जबाजारी हे घर तुझ्या लेकराचे” हे अत्यंत भावस्पर्शी गीत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रिलीज करण्यात आले. विजय मुंडाले आणि अर्जुन युवनाते हे हे या गीताचे गीतकार आणि निर्माते आहेत तर मनीष राजगिरे हे गायक आहेत. कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीसह इतर आवश्यक मदत करण्याची मागणी यावेळी सपकाळ यांनी केली. कर्जबाजारी हे घर तुझ्या लेकराचे या गीताच्या माध्यमातून गीतकार देखील सरकारला आवाहन करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande