
रत्नागिरी, 4 नोव्हेंबर, (हिं. स.) : कोकणातील भातशेतीचे मोठे नुकसान असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, असे निवेदन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सादर केले.
कोकणात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणीला आलेले भात पावसामुळे भिजून आडवे पडल्याने अनेक भागात पिके सडू लागली असून काही ठिकाणी पिकांना पुन्हा कोंब फुटले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर कोकणातील भातशेतीला तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी श्री. निकम यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुंबईत झालेल्या भेटीत श्री. निकम यांनी ही परिस्थिती सविस्तर मांडली. कोकणातील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भातशेतीवर आधारित असून, यावर्षीच्या या नैसर्गिक आपत्तीने त्यांचे आर्थिक चित्र बिघडवले आहे. मराठवाडा व विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीच्या धर्तीवर कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही तत्काळ भरपाई जाहीर करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी श्री. निकम यांनी केली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी