
लातूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।
जगाला हेवा वाटावी, अशी समृद्ध परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचा विचार जगभरात पोहचावा, यासाठी राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर यांच्या साडेसातशेव्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून परदेशातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
औसा येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, सुधाकर इंगळे महाराज यांच्यासह पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या जगाच्या कल्याणाची मागणी देवाकडून करून वैश्विक कल्याणाचा विचार मांडला. हाच विचार घेवून वारकरी संप्रदायाने आपली वाटचाल केली. या परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कीर्तन महोत्सव आयोजित केला असून वारकरी परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या औसा नगरीत हा महोत्सव होत असल्याचा आनंद ॲड. शेलार यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या दुःख दूर करून त्यांच्या जीवनात सुख, शांती यावी, अशी प्रार्थना श्रीविठ्ठलाच्या चरणी केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला 2047 पर्यंत विकसित राज्य घडवण्याचा संकल्प केला आहे. विकासाकडे वाटचाल करताना आपली विरासत म्हणजेच आपल्या समृद्ध परंपरांचेही जतन करण्याचा संदेश प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिला आहे. त्यानुसार राज्यातील विविध पुरातन वास्तू, समृद्ध परंपरा यांचे जतन करण्याचे काम मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने हाती घेतले आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले. वारकरी संप्रदायाचा विचार जगभर पोहचावा, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी परदेशातही कीर्तन महोत्सवासारखे विविध उपक्रम राबवून वारकरी परंपरेची ओळख करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
औसा तालुका आणि परिसराला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. हा परिसर विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेला आहे. या नगरीत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कीर्तन महोत्सव आयोजित केला, त्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis