स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर; २ डिसेंबरला मतदान
रायगड, 4 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२५ च्या निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपरिषदा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल


रायगड, 4 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२५ च्या निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपरिषदां आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.

निवडणुकीसाठी अधिसूचना लवकरच जारी होणार असून, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर, अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर, तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर अशी आहे.

मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होईल, आणि मतमोजणी ३ डिसेंबरला पार पडणार आहे.

या घोषणेसह संबंधित क्षेत्रांमध्ये तात्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष रितीने पार पडावी यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकूण तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे, तर तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये पार पडतील. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

एकूण ६८५ स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये सहभागी असतील. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरली जाणार आहे.

या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध पक्षांनी उमेदवार निवड प्रक्रिया सुरू केली असून, मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande