
रायगड, 4 नोव्हेंबर,(हिं.स.)। महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अखेर तारखा जाहीर झाल्या असून, राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (४ नोव्हेंबर २०२५) पत्रकार परिषदेत नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
राज्यातील विविध नगरपालिकांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस राहील. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे, तर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी पात्र उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह वाटप करण्यात येईल.
२ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर एकाच टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाईल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १० डिसेंबर रोजी अधिकृत राजपत्र प्रसिद्ध होणार आहे.या निवडणुकीत पारदर्शकता व सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष पाऊल उचलले असून, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून, आचारसंहिता लागू झाल्याने शासनाच्या सर्व विकास कामांवर आणि निधी वाटपावर निर्बंध आले आहेत. राज्यातील राजकीय वातावरण निवडणुकीच्या रंगात रंगले असून, सर्व पक्षांनी उमेदवार निवड आणि प्रचारयोजना सुरू केल्या आहेत.
मतदान: २ डिसेंबर २०२५ | मतमोजणी: ३ डिसेंबर २०२५ | राजपत्र: १० डिसेंबर २०२५
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके