
सोलापूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील पाच ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी एक कोटी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.तालुक्यातील अंकलगे, शावळ, भोसगे, संगदरी, या चार ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाख तर तांदूळवाडी ग्रामपंचायतीला २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू आहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन योजनेच्या निधी निकषात बदल करून मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यानुसार प्रस्तावाच्या अनुषंगाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ५ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाल्याने या पाच ग्रामपंचायतींना नजीकच्या काळात स्वतंत्र इमारत उपलब्ध होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड