मुंबईत मोनोरेलचा डबा रुळावरून घसरून मधोमध अडकला, मोठा अनर्थ टळला
मुंबई, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबईच्या मोनोरेलला लागलेले अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. चेंबूर ते वडाळा मार्गावर नव्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू असतानाच वडाळ्याजवळ आज, बुधवारी सकाळी मोठा अपघात घडला आहे. या अपघातात मोनोरेलचा पहिला डब
मुंबईत पुन्हा एकदा मोनोरेलला अपघात; डबा रुळावरून घसरून मधोमध अडकला, मोठा अनर्थ टळला


मुंबई, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबईच्या मोनोरेलला लागलेले अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. चेंबूर ते वडाळा मार्गावर नव्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू असतानाच वडाळ्याजवळ आज, बुधवारी सकाळी मोठा अपघात घडला आहे. या अपघातात मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर आला, मात्र सुदैवाने तो मोनोरेलच्या खांबांवरच अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला असून टीममधील एका सदस्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोनो रेलच्या चेंबूर–वडाळा मार्गावर नव्या कोचेसची चाचणी सुरू असताना वडाळा परिसरात हा अपघात झाला. घटनेच्या वेळी मोनोरेलमध्ये चालक आणि एक कंपनीचा अधिकारी उपस्थित होते. मोनोरेलचा डबा ट्रॅकवरून खाली उतरला, परंतु तो खांबांच्या रचनेत अडकल्यामुळे खाली कोसळला नाही. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. चाचणीसाठी असलेली ही गाडी असल्यामुळे यामध्ये नियमित प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अपघातानंतर घटनास्थळी मोनोरेलचे अधिकारी, अभियंते आणि अग्निशमन दल कार्यरत आहेत. मुख्यमार्गावर अडकलेला डबा हटवण्याचे काम सुरू असून, वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोनोरेलच्या सिग्नल प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोनोरेल प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

दरम्यान, याआधीही 19 ऑगस्ट रोजी चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान एक मोनो रेल सायंकाळच्या सुमारास बंद पडली होती. सव्वातासाच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. दोन-तीन ठिकाणच्या काचा फोडून सुमारे 450 प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्यात आले होते. वाढलेल्या गर्दीमुळे ही परिस्थिती उद्भवली असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते.

यानंतर सप्टेंबर महिन्यातही अशीच एक घटना घडली होती, जेव्हा चालू असलेली मोनोरेल अचानक बंद पडली होती. त्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव 20 सप्टेंबरपासून मोनोरेल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून दुरुस्ती आणि प्रणाली सुधारणा (सिस्टिम अपग्रेड) यांचे काम सुरू आहे. वडाळ्यात घडलेली ही ताजी घटना पुन्हा एकदा मुंबई मोनोरेलच्या सुरक्षेवर आणि तांत्रिक विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande