
बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या प्रयत्ना मुळे अंबाजोगाई शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून अंबाजोगाई नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १२ कोटी १३ लाख १ हजार ७६३ रुपये इतका विक्रमी निधी एकाच वेळी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाने तीन प्रमुख योजनांतील या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. मागील काही वर्षात आ. मुंदडा यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर विकासासाठी शासनाने शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यात आता आणखी निधीची भर पडली आहे. या मंजूर निधीमध्ये महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तरीय), लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेतून सर्वाधिक ६ कोटी ७५ लाख ६९ हजार ३७८ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी हा निधी वापरला जाईल, यामध्ये मांडवा रोड रोड, परळी वेस, श्रीराम नगर, अमृतेश्वर नगर, संत ज्ञानेश्वर नगर, क्रांती नगर, फुले नगर, आकाश नगर या भागांमध्ये सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे बांधकाम, पेव्हर बांधणीची कामे केली जातील.
नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेसाठी ३ कोटी ३४ लाख ६९ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून हिंगलज माता मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, हमाल गल्ली, मोची गल्ली, माळी नगर (श्रीकृष्ण मंदिर), जैन विमलनाथ मंदिर आणि गांधी नगर (प्रभाग क्र. १) यांसारख्या ठिकाणी सभागृह व सभामंडपाचे बांधकाम केले जाईल.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis