
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।
“वंदे मातरम” गीताच्या निर्मितीचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रभक्तीचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा संगम ठरणारा हा कार्यक्रम शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार असून, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने “वंदे मातरम” या गीताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व समाजमनात चेतवलेली राष्ट्रप्रेमाची जाज्वल्य भावना पुन्हा अनुभवता येणार आहे. विद्यापीठाचे प्र - कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, अधिष्ठाते, विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक,विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये/संस्था व महाविद्यालयाचे/संस्थांचे प्राचार्य आणि विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
विद्यापीठाने “वंदे मातरम” गीताच्या निर्मितीचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्ताने व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती घटित केली असून या समितीमार्फत विद्यापीठामध्ये आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा, सुलेखन, रील मेकिंग, निबंध, पोस्टर, राष्ट्रभक्तिपर काव्यलेखन व वक्तृत्व स्पर्धा तसेच वंदे मातरम अभिवाचन, पथनाट्य व प्रदर्शनी यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमांचे उदघाट्न यावेळी करण्यात येणार आहे. सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या “वंदे मातरम” गीताच्या प्रेरणादायी परंपरेला अभिवादन करण्यासाठी विद्यापीठ परिसर देशभक्तीच्या वातावरणाने उजळून निघणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु