
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये जवळपास सात तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. कोळेगाव परिसरात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे चार सदस्यीय पथक आज पाहणी करण्यासाठी आले. या पथकाने शेती, घरं, रस्ते तसेच बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
केंद्रीय पथकात केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता.
पथकाने कोळेगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे आणि तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड