
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। आयुष्यात होणाऱ्या चुका, अपराधांची शिक्षा भोगावी लागते. कारागृहातील आयुष्यात बाह्य जगताशी संपर्क तुटतो. विशेषत: महिला कैदी कारागृहात एकाकी पडतात. त्यांच्या आयुष्यात आनंद, तसेच नवी उमेद देण्यासाठी कारागृह प्रशासनाने येरवड्यातील महिला कारागृहात महिला कैद्यांसाठी ‘रेडिओ तरंग’ हा कक्ष सुरू केला आहे.‘या कक्षाच्या माध्यमातून महिला कैद्यांना नामवंत वक्त्यांची भाषणे, योगविषयक मार्गदर्शन, मनोरंजनासाठी गाणी, भक्तिगीते, महिला सक्षमीकरण, कायदेविषयक माहिती देण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन किरण बेदी यांच्या हस्ते झाले. राज्यात भायखळा आणि येरवड्यात महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. भायखळ्यानंतर येरवड्यातील कारागृहात महिला कैद्यांसाठी ‘रेडिओ तरंग’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष सुरू करण्यासाठी इंडिया व्हिजन फाउंडेशनकडून विशेष सहकार्य करण्यात आले’, अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, महिला कारागृहाच्या अधीक्षक पल्लवी कदम यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु