
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भारतीय जनता पार्टीचा प्रवेशाला दक्षिण मधील विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांकडून तीव्र विरोध झाल्याचे दिसून आले.काही दिवसांपूर्वीच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचे बंधू विक्रम शिंदे यांचा भाजप प्रवेश झाला. त्यांच्यासोबतच माजी आमदार, सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांचाही प्रवेश होणार होता परंतु दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या आणि विशेष करून आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी या प्रवेशाला तीव्र विरोध केला.भाजपच्या शहर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दिलीप माने यांचा अजूनही प्रवेश झालेला नाही. दरम्यान या प्रकारानंतर महापालिकेचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी मात्र आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड