
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।जिल्ह्यातील सात लाख ९८ हजार ९१० शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला. त्यांच्यासाठी शासनाने ८६८ कोटी रुपयांची मदत दिली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ९० हजार ९१० शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यांना मदत मिळायला १५ ते २० दिवस लागतील, अशी स्थिती आहे.सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला. तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. त्यांच्यासाठी शासनाने पंचनामे अहवाल प्राप्त होताच मदतीची रक्कम दिली. पण, याद्या वेळेत अपलोड झाल्या नाहीत, दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी देखील काढलेला नाही. त्यामुळे पाच लाखांपर्यंत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातील तलाठी, तहसीलदारांकडून ज्या शेतकऱ्यांनी नव्याने फार्मर आयडीसाठी अर्ज केले, त्यास ॲप्रुवल देत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पुढील १५ दिवसांत मदत मिळेल, असेही अधिकारी सांगतात. आतापर्यंत पाच लाख २२ हजार शेतकऱ्यांची यादी ॲप्रुवल झाल्याने त्यांना याच आठवड्यात ६४२ कोटी रुपयांची भरपाई मिळेल. त्यापैकी तीन लाख आठ हजार शेतकऱ्यांना ३६९ कोटी ७७ लाख रुपये मिळाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड