
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे 52 वर्षांच्या आतील शिक्षक सध्या चिंताग्रस्त आहेत. मात्र, त्यातच आता दीड लाख रुपये द्या अन् टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हा, अशी ऑफर शिक्षकांना एजंटाकडून येत असून, त्याची चर्चा जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये होत आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी उच्च न्यायालयाने 52 वर्षांच्या आतील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. मात्र, या निर्णयास शिक्षकांतून तीव्र विरोध होत असून, टीईटी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी होत आहे. परंतु हे प्रकरण न्यायालयाकडून आल्याने सरकारकडून कोणतेही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. या गोष्टीचा फायदा एजंटाकडून घेण्यात येत असून, टीईटी परीक्षा उत्तीर्ण करुन देतो, असे सांगत दीड लाख ते अडीच लाख रुपयांची मागणी शिक्षकांकडे करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड