
रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच रायगड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांमधील मतदार याद्यांची छाननी करताना तब्बल 4 हजार 156 दुबार मतदार आढळून आले आहेत. या मतदारांवर निवडणूक विभागाची करडी नजर राहणार असून, मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
राज्यात जाहीर झालेल्या नगरपरिषद निवडणुकांनंतर रायगड जिल्ह्यात एकूण 2 लाख 37 हजार 503 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 4 हजार 156 मतदारांची नावे दोन ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. या मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह लावण्यात आले असून, अशा मतदारांना मतदानाच्या वेळी प्रभाग निवडण्याची संधी देण्यात येईल. मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक दुबार मतदाराकडून ‘मी फक्त एका ठिकाणी मतदान करीन’ असे हमीपत्र घेतले जाणार आहे.
दुबार मतदारांमध्ये खोपोली नगरपरिषद आघाडीवर असून येथे सर्वाधिक 891 दुबार नावे आहेत. त्यानंतर कर्जत (817), पेण (784), उरण (781), महाड (359), अलिबाग (244), श्रीवर्धन (131), मुरूड-जंजिरा (69), रोहा (62) आणि माथेरान (18) या नगरपरिषदांचा क्रमांक लागतो. संबंधित नगरपरिषदांचे अधिकारी-कर्मचारी या मतदारांच्या घरांवर भेट देऊन त्यांची ओळख व प्रभागाची निवड लेखी स्वरूपात निश्चित करणार आहेत.
जिल्ह्यातील या 10 नगरपरिषदांमध्ये 107 प्रभाग असतील. खोपोली नगरपरिषद सर्वात मोठी असून 15 प्रभागांचा समावेश आहे. पेणमध्ये 12 प्रभाग तर उरण, कर्जत, महाड, अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा आणि माथेरान या नगरपरिषदांमध्ये प्रत्येकी 10 प्रभाग राहतील. या निवडणुकीत एकूण 217 नगरसेवक आणि 10 थेट नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत.
मतदान प्रक्रियेदरम्यान मोबाईल फोन केंद्रावर नेण्यास बंदी असेल, असा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांच्या अधिकारात असेल. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे. अ वर्ग नगरपरिषदेत अध्यक्षपदासाठी 15 लाख आणि सदस्यांसाठी 9 लाख, ब वर्गात अनुक्रमे 11.25 लाख आणि 3.5 लाख, तर क वर्ग नगरपरिषदेत अध्यक्षपदासाठी 7.5 लाख आणि सदस्यांसाठी 2.5 लाख रुपये खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, निवडणुकीची प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्जता दाखवली असून, दुबार मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके