
अकोला, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
स्वातंत्र्य सेनानी व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी क्रांतीची जाज्वल्य ज्योत आपल्या गीतातून सबंध देशभर पेटवली. 'वंदे मातरम' या गीत रचनेला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण मुलींची संस्था यांच्यामार्फत पं. लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. 'वंदे मातरम' गायनाचा सामूहिक सोहळा होणार आहे.
विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ अकोलेकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंके, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथील प्राचार्य शरदचंद्र ठोकरे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य केंदळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय गीत सामूहिक गायनाबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे शिल्पनिदेशक तथा प्रसिद्धी समिती प्रमुख अरविंद पोहरकर यांनी दिली. या कार्यक्रमाला अधिकाधिक अकोलेकरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्राचार्य संतोष साळुंके व प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे