
चंद्रपूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात गेल्या काही वर्षांपासून मानव–वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत चालली आहे. वनक्षेत्रातील वाघांची वाढती संख्या, घटणारे अधिवास क्षेत्र आणि मानव वस्त्यांच्या सीमारेषा ओलांडणारे वाघ यामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भातील काही वाघांचे पुनर्वसन करण्याबाबत दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली.
आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत विदर्भातील वाघांची संख्या आणि वाढता मानव–वन्यजीव संघर्ष याबाबत सविस्तर माहिती सादर केली. त्यानंतर सुमारे १० वाघांचे कोल्हापूर येथील सह्याद्री प्राणी संग्रहालयात पुनर्वसन करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली असून लवकरच त्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगितले.
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, चंद्रपूरसह विदर्भात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातून मानव–वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून अनेक जीवितहानी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर काही वाघांचे नियोजनपूर्वक पुनर्वसन आवश्यक आहे. कोल्हापूर सह्याद्री प्राणी संग्रहालयात १० वाघांचे स्थलांतर केल्यास केवळ संघर्ष कमी होणार नाही, तर या वाघांना योग्य पर्यावरणही मिळेल असे म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव