
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : ईश्वरपूर (सांगली) येथील राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
श्री. रहाटे यांनी छत्रपती शिवराय व बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित रांगोळी साकारली होती. त्यासाठी श्री. रहाटे यांना २२ तासांचा कालावधी लागला.
आयोजकांनी स्पर्धेसाठी 'छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिचित्र व त्यांच्या जीवनातील प्रसंग' हा विषय दिला होता. स्पर्धेसाठी ३ बाय ४ फूट आकाराची रांगोळी साकारायची होती. महाराष्ट्रातील नामवंत ३० स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात श्री. रहाटे यांना द्वितीय क्रमांक मिळाला. त्यासाठी त्यांना रोख पारितोषिक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनाधिष्ठित प्रतिकृतीचे सन्मानचिन्ह, तसेच प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांनी गौरविले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी