
रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर अलीकडे मोठ्या प्रमाणावर जमीन घोटाळ्याचे आरोप होत असून, त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधत पुराव्यांसह गंभीर आरोप केले आहेत.
दमानिया यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) अकाउंटवर काही कागदपत्रे शेअर करत पार्थ पवार यांच्या नावावर झालेल्या एका संशयास्पद जमीन व्यवहारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “शेतकऱ्यांना सारखं ‘फुकट, फुकट’ म्हणणारे अजित पवार, पण पोराच्या १८०४ कोटींच्या डीलवर फक्त ३०० कोटी दाखवले आणि १२६ कोटींची स्टँप ड्युटी टाळली. ही माफी फुकट नव्हती का?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या Amadea Holdings LLP या कंपनीने १८०४ कोटी रुपयांची महार वतनाची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत विकत घेतली. एवढेच नव्हे तर या व्यवहाराची स्टँप ड्युटी दोन दिवसांत माफ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी पुढे विचारले की, “ही जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही, मग महसूल मंत्री या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई कधी करणार?” यासोबतच दमानियांनी या प्रकरणावर तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत —
१) त्या परिसरातील आधीच्या व्यवहारांचे दर काय होते?
२) स्टँप ड्युटी माफीचा निर्णय कोणी आणि कुठल्या अधिकाराने घेतला?
३) १ लाख रुपयांच्या Paid Up Capital असलेल्या कंपनीत ३०० कोटी कुठून आले.?
या सर्व बाबींची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “जर हा निधी पार्थ पवारांनी दिला असेल, तर हे Office of Profit मध्ये मोडते आणि अशा परिस्थितीत अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल,” असा थेट इशारा अंजली दमानियांनी दिला आहे. दरम्यान, अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके