भाईंदरपाडा येथे ५० कोटींच्या महिला वसतिगृहाचे भूमिपूजन सरनाईक यांच्या हस्ते संपन्न
ठाणे, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। ठाणे शहरात नोकरी - व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचा भुमीपुजन गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्
ठाणे


ठाणे, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। ठाणे शहरात नोकरी - व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचा भुमीपुजन गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले तत्काल मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी एसटीमध्ये ५० टक्के प्रवासी तिकिटामध्ये सवलत देण्याची योजना सुरू केली त्याच बरोबर पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा १५०० रुपये पेन्शन योजना देखील चालू केली. या योजनेचा विस्तार करीत ठाणे शहरात नोकरी - व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय योजना” अंतर्गत ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, हा निधी ठाणे महापालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मी विशेष पाठपुरावा केल्यामुळे मिळाला आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, भाईंदरपाडा, घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या या नऊ मजली महिला वसतिगृहात सर्व सोयी-सुविधांनी युक्त व्यवस्था असणार आहे. वाहन पार्किंग, फूड कोर्ट, तसेच मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयींसह या इमारतीची रचना करण्यात आली आहे.

१०० खोल्यांचे हे वसतिगृह एकावेळी ४०० कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल. दोन वर्षांच्या कालावधीत या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे ठाण्यात नोकरी- व्यवसाय करणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारे निवासस्थान उपलब्ध होणार आहे आणि हीच ठाण्याच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, माजी नगरसेविका साधना जोशी, ओवळा माजिवडा विधानसभा शहरप्रमुख राजेंद्र फाटक, विभाग प्रमुख रवी घरत, उपविभाग प्रमुख राजेंद्र पाटील, विधानसभा सचिव साजन कासार, विधानसभा उपशहर प्रमुख कृष्णा भोईर, महिला विभाग प्रमुख रोहिणी ठाकूर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

“कार्यरत महिलांसाठी सन्माननीय व सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे; आणि हे वसतिगृह त्या दिशेने ठाण्याचा आदर्श प्रयत्न ठरेल,” असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रसंगी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande