
मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा, मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, तसेच भन्ते डॉ.राहुल बोधी, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री आठवले म्हणाले, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता या सर्व बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.
या बैठकीत चैत्यभूमी परिसर आणि शिवाजी पार्क परिसरातील रस्त्यांची सुधारणा, वाहतुकीचे नियंत्रण, सीसीटीव्ही व्यवस्था, भोजन व आरोग्य सुविधा, शासकीय जाहिरात प्रसिध्दी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामकाज तसेच दादर येथील अशोकस्तंभ ते चैत्यभूमीपासून इंदू मिलपर्यंतचा रस्ता याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर