
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
शहरामध्ये विविध कामे व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या वाहनतळावर वाहने लावण्यासाठी (पार्किंग) मोटारींना ६० ते ७० रुपये, तर दुचाकीसाठी २० ते ३० रुपये प्रतितास मोजण्याची वेळ आली आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या दराच्या दुप्पट-तिप्पट नव्हे, तर तब्बल पाचपट जादा शुल्क आकारून ठेकेदारांकडून नागरिकांची लूट होत आहे. तरीही महापालिका प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे.
विविध प्रकारची खरेदी, देवदर्शन, पर्यटन तसेच विविध कामांच्या निमित्ताने नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. उपनगरे व बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. महात्मा फुले मंडई, नारायण पेठ, पुणे स्टेशन अशा विविध ठिकाणच्या महापालिकेच्या वाहनतळांवर नागरिक वाहने लावतात. संबंधित वाहनतळांच्या ठिकाणी दुचाकींसाठी दोन रुपये तर चारचाकी वाहनांसाठी १४ रुपये प्रतितास असा महापालिकेचा दर आहे. परंतु, संबंधित ठेकेदार या नियमाचे सर्रास उल्लंघन करून मनमानी पद्धतीने वाहनचालकांकडून शुल्क आकारणी करीत असल्याचे नागरिकांनी केलेल्या तक्रारी व ‘सकाळ’ने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु