
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. शहरातील संकल्प हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. विशेष म्हणजे, मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी उर्फ पिट्या यांना सोशल मीडिया पोस्टवरून थेट फटकारले गेले.
बैठकीला मनसेचे वरिष्ठ नेते आणि पुणे शहरातील सर्व शाखाध्यक्ष उपस्थित होते. राज ठाकरे यांनी स्वतः शाखाध्यक्षांना मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. मात्र, बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांनी एका प्रमुख पदाधिकाऱ्याला सोशल मीडिया पोस्टवरून लक्ष्य केले. रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष आहेत. ते संघाचा (आरएसएस) कट्टर कार्यकर्ता असल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होते. हा फोटो पाहिल्यानंतर राज ठाकरे संतापले आणि कार्यकर्त्यांसमोर परदेशींना सुनावले. छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे, मग इथे कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा, असे कठोर शब्द राज ठाकरे यांनी परदेशींना उद्देशून म्हटले. यामुळे बैठकीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु