
बीड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजिवन समाधीची २४ वी शासकीय महापुजा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की,
आपण या पवित्र, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळी एकत्र आलो आहो. ही केवळ भूमी नाही त्या कपिलमुनींची तपोभूमी आहे, ज्यांच्या ज्ञानप्रकाशाने संपूर्ण जग उजळले. पुराणांमध्ये लिहिले आहे जिथे तप, भक्ती आणि आत्मज्ञान एकत्र नांदतात, तेच स्थळ तीर्थक्षेत्र बनते. कपिलधार हे त्याचे सर्वात सुंदर रूप आहे. येथे आलेला प्रत्येक भक्त मनातील अंध:कार दूर करतो, अहंकाराचा त्याग करतो आणि आत्मज्ञानाच्या मार्गाला लागतो.
समाजाच्या हितासाठी आणि न्यायासाठी लढा देणारी शिवा संघटना निश्चितच अभिमानास्पद काम करत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या समाजविधायक कामांना पाठिंबा असेल.
राजकीय क्षेत्रात काम करत असताना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून नवनवीन योजनांचा अवलंब निश्चितपणाने येत्या काळात करणार आहे. त्या योजनांचा समाजातील प्रत्येक घटकाला फायदा होईल.
समाज म्हणून आपण सर्वजण एक आहोत. परमेश्वराने आपल्याला हा देह दिला; त्या देहाला आपण सार्थकी लावण आपलं काम आहे. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिलेला संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात अवलंबला पाहिजे. अध्यात्माच्या माध्यमातून स्वतःबरोबरच समाजाची प्रगती करण्यावर आपण सर्वांनी भर द्यावा.
समाजभान राखून आपण सर्वजण शिवा संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणाने येत्या काळात चांगलं काम कराल अशी अपेक्षा आहे. जिथे कुठे तुम्हाला अडचण येईल त्या ठिकाणी हा बाबासाहेब पाटील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. असेही मंत्री पाटील म्हणाले
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis