ठाणे जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे आयोजन
ठाणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ (Teacher Eligibility Test – TET) रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ३२ परीक्
ठाणे जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे आयोजन


ठाणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ (Teacher Eligibility Test – TET) रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ३२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून १७,०३३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत.

टीईटी म्हणजे Teacher Eligibility Test ही शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता परीक्षा आहे. उमेदवारांच्या अध्यापन क्षमतेचे, शैक्षणिक ज्ञानाचे तसेच बालविकास व शैक्षणिक मानसशास्त्राचे मूल्यांकन करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा, २००९ (RTE Act) अंतर्गत बंधनकारक असून, गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देणे हा तिचा प्रमुख हेतू आहे.

ठाणे जिल्ह्यातील परीक्षेसाठी पेपर-I साठी ७,८०३ आणि पेपर-II साठी ९,२३० उमेदवारांनी अर्ज केला आहे. पेपर-I सकाळी १०.३० ते दुपारी १.०० व पेपर-II दुपारी २.०० ते ४.३० या वेळेत होईल. शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन सर्व परीक्षा केंद्रांवरील आवश्यक भौतिक सुविधा व बैठक व्यवस्थेची तपासणी केली आहे.

परीक्षा नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था

परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७ ऑक्टोबर, २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून परीक्षा तयारीचा आढावा घेतला.

सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. परीक्षेदरम्यान मेटल डिटेक्टर, फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक तपासणी करून गैरप्रकार टाळण्याची काळजी घेण्यात येत आहे.तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाची (District Control Room) स्थापना करून सर्व परीक्षा केंद्रांशी सातत्याने संपर्क सुरू आहे.

“सर्व उमेदवारांनी वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करावे, केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुरक्षा, आसनव्यवस्था आणि पर्यवेक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकांच्या गुणवत्तेचे प्रतीक असून या माध्यमातून गुणवत्ता धारक शिक्षक प्राप्त होण्यास मदत होणार आहे – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande