
बीड, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेले पॅकेज कसे अपुरे आहे. सरकारने कसा दगा दिला या संवेदनशील विषयासाठी शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमाचे नियोजन पदाधिकाऱ्यांकडून चुकले असल्याचे दिसून आले.
त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत निरोपच पाहचले नाहीत. परिणाम या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. उद्धव ठाकरे कार्यक्रम स्थळी आल्यानंतर शेतकऱ्यांची
जमावजमव करण्याची पदाधिकाऱ्यांवर वेळ आली. शेतकऱ्यांपेक्षा पोलिस बंदोबस्तच अधिक होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना पक्ष मागील काही दिवसांत आक्रमक झाला आहे. अतिवृष्टीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये पाहणी केली होती. त्यानंतर सरकारने दिवाळी पूर्वी अनुदान देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात काहींना अनुदान मिळाले तर काहींना मिळाले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे यांनी पुन्हा शेतकऱ्यांशी पॅकेजचे काय झाले म्हणत संवाद दौरा सुरु केला आहे. यातून पक्ष पुन्हा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत आगामी शेतकऱ्यांमधील असंतोष पोहचवणे, निवडणुकांमध्ये कायम ठेवणे, सरकारचे अपयश ठळकपणे दाखवून देणे यासाठी उध्दव ठाकरे बुधवारपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी बीड तालुक्यातील पाली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन केले होते. याच्या पूर्व तयारी पाहणीसाठी दोन दिवस आधी शिवसेना नेते अंबादास दानवे बीडमध्ये येऊन गेले होते.
पाली येथे खंडोबा मंदिर परिसरात संवाद कार्यक्रम होता. परंतु, उद्धव ठाकरे कार्यक्रम स्थळी आले तरी शेतकरी आलेले नव्हते. शिवसेना पदाधिकारी व मोजके शेतकरी उपस्थित होते. केवळ ४० ते ५० शेतकरी होते. सगळा मंडप रिकामा होता. ठाकरे आल्यानंतर गावातून नागरिकांना जमा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ झाली.
कार्यक्रमापूर्वी अंबादास दानवे हे कार्यक्रमस्थळी आले. मात्र तिथे मोजके पाच, दहा शेतकरी हजर होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत गावातून शेतकरी गोळा करा, माईकवरुन ठाकरे आलेले आहेत असे पुकारा असे सांगितले. दानवे यांनी नियोजनावर नाराजी व्यक्त केली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis