
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)युवा पिढीने वंदे मातरम गीतातून प्रेरणा घेऊन स्वतःला राष्ट्रविकासात योगदान देण्यासाठी सज्ज करावे असे आवाहन भारतीय लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल संजय प्रताप सिंह विश्वासराव यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस व आयबीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधू स्मारक येथे आयोजित वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना राष्ट्राप्रती त्याग, शक्ती आणि भक्ती ही मूल्ये जपण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महत्व जागृत करण्याच्या उद्देशाने वंदे मातरम गीताला दीडशेव्या वर्षपूर्ती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए विद्याशाखेचे विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या वंदे मातरमच्या उत्स्फूर्त घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
या कार्य्रक्रमासाठी पवन शर्मा यांनी मोलाचे योगदान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु