
जळगाव , 6 नोव्हेंबर (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपली कला, कल्पकता आणि सर्जनशीलता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
भारतीय लोकसंगीत, वाद्यवृंद, समूहगान, पाश्चिमात्य गायन, एकांकिका, वक्तृत्व, मातीकला, कोलाज, रांगोळी अशा विविध कलाप्रकारांतून तरुणाईने आपली कला खुलवली. विद्यापीठ परिसरात सर्वत्र रंगतदार तयारी, तालीम आणि सादरीकरणांमुळे जणू इंद्रधनुष्याचे रंग जिवंत झाल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले. राज्यभरातील २४ विद्यापीठांमधून सहभागी विद्यार्थी जळगावात दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी विद्यापीठ परिसरात जळगाव जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक वारशाचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. साने गुरुजी, कवी केशवसुत, धनाजी नाना चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी, डॉ. जी.डी. बेंडाळे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पद्मश्री कवी ना.धो. महानोर, भवरलालजी जैन, भालचंद्र नेमाडे आणि शीतल महाजन यांच्यासह जिल्ह्याचे नामवंत व्यक्तिमत्त्व दाखविणारे फलक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच पाटणादेवी, उनपदेव, वालझरी, फरकांडे, कन्हेरगड, चांगदेव आणि भुईकोट किल्ला यांसारख्या पर्यटन स्थळांची माहिती पाहण्यासाठी विद्यार्थी उत्साहाने गर्दी करत होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद स्पर्धेत तबला, सनई, पखवाज, तुतारी, पुणेरी ढोल-ताशा, हार्मोनियम यांसारख्या पारंपरिक वाद्यांवर विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. त्यानंतर भारतीय समूहगान या प्रकारात ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘सरफरोशी की तमन्ना’, ‘येळकोट जय मल्हार’, ‘अंबाबाई तुला वंदन’ अशा देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पाश्चिमात्य गायन आणि वाद्यसंगीताने जागतिक लयींचा संगम घडविला, तर भगवान बिरसा मुंडा सभागृहात सादर झालेल्या एकांकिकांनी समाजातील वास्तवाचे जिवंत चित्र रेखाटले. ‘वयाचं गणित’, ‘पुनर्वसन’, ‘ॲडमिशन’, ‘बरड’ यांसारख्या नाट्यप्रयोगांनी प्रभावी अभिनय आणि दिग्दर्शनाने उपस्थितांना भावविभोर केले.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिक्षण, संस्कृती, ग्रामीण विकास आणि परंपरा या विषयांवर आपली विचारशक्ती प्रभावीपणे मांडली, तर प्रश्नमंजुषेत ज्ञानवृद्धीचा मेळा रंगला. बाल हुतात्मा शिरीषकुमार सभागृहात मातीकला, कोलाज आणि रांगोळी स्पर्धांनी वातावरण रंगविले. मातीकलेतून निसर्गाचे सौंदर्य, कोलाजमधून कल्पनाशक्तीचे दर्शन, तर रांगोळ्यांमधून रंगांची अद्भुत उधळण पाहायला मिळाली. उद्या, शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी पाश्चिमात्य समूहगान, सुगमसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय वाद्यसंगीत, एकांकिका, मुकाभिनय, वादविवाद, लघुचित्रपट, व्यंगचित्रे, स्थळ छायाचित्रण आणि पोस्टर मेकिंग अशा अनेक आकर्षक स्पर्धा रंगणार आहेत. या कार्यक्रमास कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. सुरेखा पालवे, प्राचार्य महेंद्रसिंग रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, प्रा. अनिल डोंगरे, नितीन ठाकूर, नेहा जोशी, स्वप्नाली महाजन, डॉ. संदीप नेरकर, डॉ. ऋषीकेश चित्तम, वैशाली वराडे आदी मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर