
नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
विधानसभा निवडणुकीनंतरच विरोधकांकडून मतबंदीचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? लोकसभा निवडणुकीत १४ वेळा बुरखा घालून मतदान झाले, तेव्हा का विचारले नाही? बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला होत्या का, हा प्रश्न कुणी विचारला का? मोहम्मद अली रोडवर किती बोगस मतदार आहेत, त्याबद्दल का बोलले जात नाही? दोन्ही बंधूंनी त्यावेळी या विषयावर का काही विचारले नाही, असा सवाल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केला.
मंत्री राणे गुरुवारी ( दि. ६ ) नाशिक दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला.
त्याप्रसंगी ते म्हणाले की, मत्स्य उत्पादन आणि व्यवसाय कसा सुरू आहे, तसेच कृषी दर्जा मिळाल्यानंतर विभागाचे कामकाज कसे सुरू आहे, याचा मी जिल्हानिहाय आढावा घेत आहे. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. पार्थ पवार कंपनीच्या जमीन प्रकरणाबाबत विचारले असता राणे म्हणाले की, या प्रकरणाची अद्याप मला काहीही माहिती मिळालेली नाही. या संदर्भात भाजप नेते निर्णय घेतील. सिंधुदुर्ग युतीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, त्या विषयावर मी तिथेच जाऊन उत्तर देईन. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवरील टीकेबाबत बोलताना राणे म्हणाले की, आमच्या कीर्तनकारांवर वारंवार टीका केली जाऊ नये. केवळ हिंदू कीर्तनकारांकडे लक्ष देण्याऐवजी इतर धर्मांमध्ये देखील मोठे कार्यक्रम आणि विवाह सोहळे होत असतात.आपल्या देशात राहणारा प्रत्येक नागरिक देशभक्त असला पाहिजे, मुस्लीम देशभक्तांबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही; पण जिहादी विचारांचे ‘हिरवे साप’ आहेत, त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे. मौलाना डुप्लिकेट विषय असतो, कारण ते पूर्वी हिंदूच होते, असा उल्लेख त्यांनी केला.तर जमीन घोटाळ्याबाबत विचारले असता राणे म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी करतील असेही मंत्री राणे यांनी म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV