
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : देवरूखमधील सामाजिक भान जपणारे व वेळोवेळी अनेकांसाठी सढळ हस्ते मदत करणारे यासिन खतीब यांनी या मुलींसाठी लागणारा एक महिन्याचा किराणामाल गोकुळ अधीक्षिकांकडे सुपूर्द केला.
मावशी हळबे यांनी सुरू केलेल्या देवरूख मातृमंदिर बालिकाश्रमात सध्या १७ मुली शिक्षणाबरोबरच आत्मभानाचे धडे गिरवत आहेत. या मुलींसाठी समाजाकडून वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला जात असतो. या मुलींसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार यासिन खतीब यांनी ही मदत केली. त्यांनी याआधीही गोकुळ बालिकाश्रमाला मदत केली आहे. एक महिन्याचा किराणा माल खतीब यांनी पोहोच केला.
मातृमंदिरचे कार्योपाध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी यासिन खतीब यांचे आभार मानले आहेत. समाजातील अशा दातृत्ववान, कर्तृत्ववान देणगीदारांमुळे या मुलींच्या शिक्षणासाठी, आत्मभान जपण्यासाठी हातभार लागत असल्याची भावना हेगशेट्ये यांनी व्यक्त केली.
यावेळी यासिन खतीब म्हणाले, आपल्याला जे मिळाले आहे,मिळत आहे त्यातील काही वाटा समाजघटकांसाठीच असतो. हे आपण जपले की समाजही तेवढाच प्रगल्भ होतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी