
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। उसासह वेगवेगळ्या पिकांतील तण नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सर्रास ‘टुफोरडी’ या तणनाशकाचा वापर केला जातो. दरवर्षी त्याचा सोलापूरसह राज्यभरातील द्राक्षासह फळबागांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्यामुळे टुफोरडीवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर द्राक्ष तर ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर डाळिंब आहे. दोन लाख हेक्टरवर ऊस आहे. उसासह इतर पिकांतील तण नष्ट करण्यासाठी टूफोरडी या तणनाशकाचा वापर केला जातो. मजुरांचा तुटवडा, वाढलेली मजुरी व वेळेअभावी शेतकरी टुफोरडी तणनाशकाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. मात्र, या तणनाशकाच्या फवारणीमुळे शेजारच्या द्राक्षबागांसह फळबागा जळून नुकसान होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड