
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। मोहोळ तालुक्याची राजकीय परिस्थिती विचित्र झाली आहे, अशी चर्चा आम्ही ऐकतोय. कुणी भाजपमध्ये जातोय तर कोण आघाडी करून लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा जो संकटकाळी पवारसाहेबांच्या मागे उभा राहिला अशा तरुणांना संधी देणार आहे. आम्ही चिन्हावर निवडणुका लढवणार आहोत. आघाडी होवो अथवा न होवो. वेगळी आघाडी करून लढायचे व नंतर इकडून तिकडे उड्या मारायच्या, हे या पक्षात चालणार नाही. कुठलाही निर्णय मी एकटा घेणार नाही. त्यासाठी कोअर कमिटी स्थापन करून उमेदवारी निश्चित करण्याची जबाबदारी समितीवर असणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी व विचारविनिमय करण्यासाठी मोहोळ येथे कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार मोहिते पाटील म्हणाले, खासदार शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. सर्वांनी कामाला लागावे. केवळ लेटर पॅड वर स्वतःची कामे करू नयेत, सर्वसामान्यांना न्याय द्यावा. माजी आमदार रमेश कदम म्हणाले, मी आमदार झालो ते केवळ खासदार शरद पवारांच्या विचारांमुळेच. त्यामुळेच मोहोळची बाजारपेठ मी वाचवू शकलो. जी महिला खरोखर अनुसूचित जाती आरक्षणाची आहे. तिलाच नगराध्यक्षपदाची संधी मिळाली पाहिजे. बनावट दाखले आणून सत्ता काबीज करणाऱ्यांना संधी देऊ नये. मोहोळची नगरपरिषद ही ठेकेदारमुक्त झाली पाहिजे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड