कौंडण्यपुरात दहीहंडी सोहळ्याला उसळला भक्तांचा सागर
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.) माता रुक्मिणीचे माहेरघर व भगवान श्रीकृष्णाचे सासर असलेल्या कौंडण्यपुरात गुरुवारी दुपारी ४.३० वाजता कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने दहीहंडी सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांवर दह्याचा प्रसाद उधळण्यात आला. या
कौंडण्यपुरात दहीहंडी सोहळ्याला उसळला भाविक भक्तांचा सागर  आचार्य जितेंद्रनाथ महाराजांचे प्रबोधन


अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.)

माता रुक्मिणीचे माहेरघर व भगवान श्रीकृष्णाचे सासर असलेल्या कौंडण्यपुरात गुरुवारी दुपारी ४.३० वाजता कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने दहीहंडी सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांवर दह्याचा प्रसाद उधळण्यात आला. या वेळी वारकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. कौंडण्यपूर येथील कार्तिक उत्सवासाठी विशेषत: उत्सवाच्या समारोप प्रसंगी आयोजित दहीहंडीला जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या येथे दाखल होतात. वर्धा नदीत आंघोळ केल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी त्यांच्या भगव्या पताका, दिंड्यांसह दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यात मोठ्या संख्येत गावकऱ्यांचाही समावेश होता. त्यामुळे कौंडण्यपूर येथे आज भाविकांचा मेळा भरल्याचे दिसून आले.

कौंडण्यपूर येथे कार्तिक उत्सवात दरवर्षी हजारोंच्या संख्येत भाविक हजेरी लावत असतात. आषाढी एकादशी व कार्तिक महोत्सव हे येथील दोन प्रमुख उत्सव असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून भाविक याप्रसंगी उपस्थित राहतात.

सर्वप्रथम सकाळी विधिवत श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे महाभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर माता रुक्मिणीच्या पालखीसह टाळ, मृदंग आणि रुक्मिणीच्या जयघोषाने संपूर्ण पालख्यांची नगर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर दुपारी श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानात लक्ष्मण महाराज बोधीगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. नंतर संजय महाराज ठाकरे यांनी रुक्मिणीचा जयघोष केला. या वेळी व्यासपीठावर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांची उपस्थिती होते.

आ. राजेश वानखडे, माजी आ. दादा केचे, भाजप जिल्हाध्यक्ष रवीराज देशमुख, सुधीर दिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सदानंद साधू यांनी केले. त्यानंतर या दहीहंडी सोहळ्याला खा. बळवंत वानखडे, भाजप जिल्हाध्यक्ष रवीराज देशमुख, आ. राजेश वानखडे, संजय देशमुख, सरपंच प्रेमदास राठोड, गौरी देशमुख, पूजा आमले, मंदिर समितीचे उपाध्यक्ष वसंत डाहे, विश्वस्त ठाकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांच्यासह अंबा- रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच हजारो वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन कार्तिक महोत्सवाच्या समारोपाला दहीहंडीच्या आधी कौंडण्यपूर येथील विविध मंदिरांत दिंडीसह दाखल होणाऱ्या हजारो वारकरी, भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना अन्नदान करण्याच्या उद्देशाने अनेकजण स्वेच्छेने मंदिरांमध्ये धान्य, भाजीपाला, तेल, मसाले दान करत असतात. वर्षातून एकदा आयोजित होणाऱ्या या सोहळ्यात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी मंदिर संस्थानांद्वारेही विशेष नियोजन केले जाते. भाविकांना महाप्रसादासह पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात आले. तसेच त्यांच्या विश्रांतीची व्यवस्थाही करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande