
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.)
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र शासन अनुदानित 'अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवा'चे आयोजन महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह रेशीमबाग, नागपूर येथे कला गौरव संस्था व अक्षरक्रांती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. राम गणेश गडकरी प्रतिष्ठान प्रायोजित हा साहित्य महोत्सव असणार आहे. साहित्य महोत्सवाचे स्वागताध्यक्ष डॉ. गिरीष गांधी (अध्यक्ष, वनराई फाऊंडेशन) हे राहणार आहेत. नुकतीच सावनेर येथे राम गणेश गडकरी निवासस्थानी डॉ. गिरीष गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जेष्ठ कथाकार वसंत वाहोकर यांची साहित्य महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. तसेच विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची उद्घाटकपदी निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सत्राला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा दै.महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित तथा माजी सदस्य विलास सिंदगीकर प्रमुख अतिथी असतील. विशेष उपस्थिती म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार व कथाकार उर्मिला देवेन टोक्यो (जपान) तसेच सुप्रसिद्ध कवी मनोज भारशंकर, अबुधाबी (यूएई) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. साहित्य महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात देश-विदेशातील मराठी साहित्यिकांच्या कथा, कविता, वैचारिक लेख, समीक्षा इत्यादींचा समावेश असलेली स्मरणिका तसेच साहित्यिक मंडळींच्या डझनभर पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. समारोपीय सत्राला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य मा. डॉ. प्रमोद मुनघाटे तथा अखिल भारतीय मराठी साहित्यमंडळाचे सदस्य मा. डॉ. गजानन नारे तसेच जेष्ठ साहित्यिक मा. तीर्थराज कापगते हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय साहित्य महोत्सव एकूण अकरा सत्रात संपन्न होणार आहे. उद्घाटन सत्राच्या सुरुवातीला 'महाराष्ट्राची लोकधारा' हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित असून यात भूपाळी, वासुदेव आला, भारूड, पोवाडा, लावणी, दिंडी यांचे आयोजन केले आहे. 'ग्रामीण संस्कृती दर्शन' हा कार्यक्रमाचे सादरीकरण कला गौरव संस्थेची चमू करणार आहे. या दोन दिवसीय साहित्य महोत्सवात 'प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेमधूनच असायला हवं' या विषयावर परिसंवाद होणार असून 'शेती हा उद्योग झाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत', या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. बाल कवीसंमेलन, गझल संमेलन, वऱ्हाडी कवीसंमेलन, निमंत्रितांचे कवीसंमेलन, कथाकथन, प्रकट मुलाखत, नवोदितांचे कविसंमेलन इत्यादी अकरा सत्र राहणार आहेत. संत्रानगरीच्या नागपूरकर मंडळींना हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत साहित्यिक मेजवानी मिळणार आहे. सभेला प्रामुख्याने आयोजन समितीचे तथा अक्षरक्रांती फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर घोरसे, उपाध्यक्ष गणेश भाकरे, सचिव तथा कला गौरव संस्थेचे अध्यक्ष डॉ. संगीता बानाईत, सहसचिव प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त', कोषाध्यक्ष भागवत बानाईत, सदस्य देवेंद्र काटे, सचिन सुकलकर, मा. वंदना घोरसे, ॲड्. अरविंद लोधी, बाबा निमजे, संजय टेंभेकर, प्रा.कोल्हे, वर्षा ढोके,अमीन सय्यद इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. या साहित्यिक मेजवानीचा भरभरून लाभ नागपूर व परिसरातील साहित्यिक मंडळींनी व रसिक-श्रोत्यांनी अवश्य घ्यावा; असे आवाहन साहित्य महोत्सव आयोजन समितीचे प्रमुख शंकर घोरसे व सचिव डॉ. संगीता बानाईत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी