
छत्रपती संभाजीनगर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेचा हिस्सा म्हणून ८२२ कोटी रुपयांच्या कर्जावर मुंबईत शिक्कामोर्तब करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी मुंबईत महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रचर डेव्हलपमेंट कंपनीसोबतच्या करारावर सही केली. त्यामुळे पाणी योजनेतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे.
शहरासाठी केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून २७४० कोटी रुपये खर्च करून नव्या पाणी पुरवठा योजनेचे काम केले जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनेसाठी हैदराबाद येथील जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली असून, सध्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. योजनेत केंद्र सरकारचा २५, राज्य शासनाचा ४५ टक्के तर महापालिकेचा ३० टक्के निधी आहे. केंद्र व राज्य शासनाने त्यांच्या हिश्शाचा निधी दिला आहे.
महापालिकेच्या हिश्शाचे ८२२ कोटी रुपये राज्य शासनाने टाकावेत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते, मात्र हा निधी कर्ज स्वरूपाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार आठ ते नऊ महिन्यापासून कर्जाची प्रक्रिया सुरू होती. यासंदर्भात महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रचर डेव्हलपमेंट कंपनीसोबतच्या करारावर जी. श्रीकांत यांनी सही केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis