
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.) :अमरावती जिल्ह्यात 'स्क्रब टायफस' या संसर्गजन्य आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरु केल्या आहेत. 'ओरिएंटा त्सुत्सुगामुशी' नावाच्या जिवाणूमुळे होणारा हा आजार 'माईट' नावाच्या विशिष्ट कीटकाच्या चाव्यातून पसरतो. तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुख या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी बाधित गावांमध्ये जलद ताप सर्व्हेक्षण आणि कीटक सर्व्हेक्षण सुरू केले आहे. झुडपांमध्ये वास्तव्य करणाऱ्या माईटच्या नियंत्रणासाठी टेमीफॉस आणि मॅलीथिऑन पावडरचा वापर करून कीटकनाशक फवारणी केली जात आहे. वाढलेले गवत आणि अनावश्यक झुडपे काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, खुल्या जागी शौचास जाणे टाळणे आणि घराजवळ स्वच्छता राखून कीटकनाशक औषधांचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी